Saturday, June 2, 2007

त्रीवेणी संगम

"ये मेरी तीसरी तलाश होगी. शायद इस बार मै ढुंढ सकु गडे हुवे मॅमद्स को." डिस्कवरी चॅनलवर डॉ. काझुफूमी गोटो आपलं मन मोकळं करीत होते.
"मै एक बुढे आदमी का प्रणय लाना चाहता हू, जवाँ लोगों के दिलों में" या वाक्यासरशी 'डिस्कव्हरी पिपल' या कार्यक्रम संपला. टिव्ही झटकन बंद करून समोरच्या व्यक्तीने रीव्हॉल्व्हींग चेअरवर बसल्या बसल्याच गिरकी घेतली, व डोळे बंद करून विचाराधीन झाली. समोरच बसलेल्या दूसर्र्या माणसाने नाक मुरडले.
-"कम ऑन देवाशिष, काय हे? आजवर शेकडो वेळा हाच कार्यक्रम पाहून तू हाच ट्रान्स घेतोस! अनबिलीव्हेबल!"
-" अरे जा दू है भाई, तु नही समझ सकता..."
-" कसली जादू?" समोरून प्रतीप्रश्न.
-" अरे जादू म्हणजे डॉ. काझुफूमी! चमत्कार आहे मित्रा! अरे ही व्यक्ती एकदा दोनदा नाही, तब्बल तीन वेळा अतीदुर्गम भागाची सफर करून आलेली आहे! अगदी जीवावर बेतू शकणारी सफर! आणि ते कशासाठी माहितीये? अरे जस्ट फॉर अ सिंगल विल! मॅमद्स डिस्कवरी... अरे काय हिम्मत.. आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ईच्छाशक्ती... व्हॉट अ विल-पॉवर यार!" देवाशिष बोलतच होता. झपाटल्यागत.
-" अरे देवा! मॅमद्स, आणि मॅमद्स्! दूसरं काही सूचत नाही का रे तूला? अरे एवढे कष्ट करून शिकलास... ईतक्या चांगल्या पदावर काम करतोयस... आयुष्य सुखात सुरु आहे... आणि हे कसलं भलतंच खूळ? म्हणे मॅमद्स डिस्कव्हरी!"
-" अरे हाच... अगदी हाच फरक आहे तुम्हा आर्टीस्टीक लोकांमध्ये आणि आम्हा सायन्सवाल्यांमध्ये. तुम्ही अल्पसंतुष्ट लोक. जे आहे , जेवढं आहे, ते तेवढंच ठीक आहे, अश्या विचाराचे! काही नवं शोधायची, जगाला हलवून सोडेल असं काही शोधण्याची ईच्छाच तुमच्या एज्युकेशनमध्ये मारून टाकली जाते!" आत देवाशिषही बोलू लागला होता.
-" आणि सायन्स काय सांगते? एखाद्या गोष्टीचा असा काही ध्यास घ्या, की मग आपलं कुटुंब, मित्र-परिवार, काम, सगळ्यांकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल! नाही का?" समोरून धिरगंभिर पण तोडिस तोड उत्तर आले.
-" नाही, स्वानंद, अरे सायन्स सांगते, स्वप्ने पहा! मोठी... त्याहूनही मोठी आणि त्याच्या पुर्णत्त्वासाठी अविरत झटा! प्रयत्न करा!"
-" म्हणजे?"
-" म्हणजे असं बघ... आता मला मॅमद्स डिस्कव्हरी या ऐतीहासिक शोधकार्यात रस आहे. मी त्यात काहीतरी करू शकतो असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी या विषयाचा पिच्छा पूरवतोय. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, आणि ते करत असतांना ईतर बाबींकडे होतंय जरा दुर्लक्ष! बट आय डोन्ट केअर अबाउट दॅट्!"
-" वेल, मलाही थोडंफार पटतंय तूझं... पण हाती सगळं असतांना पळत्या गोष्टीच्या पाठीमागे स्वतःला इतकं वाहून घेणं म्हणजे..." स्वानंद बरंच काही बोलणार असावा, पण त्याला मध्येच थांबवून देवाशिष बोलला..
-" अरे पण एखाद्या गोष्टीचा कायम ध्यास घेतला, त्याचं वेड लावून घेतलं, तरच ती पुर्णत्त्वास जाते, असं सांगीतलंय ना... तूमच्याच संस्कृत साहित्यात"
-" संस्क़ृत साहित्य! अरे बाबा... त्यावर नकोच बोलूस! ते तर सर्वव्यापी आहे. प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट मार्गदर्शक आहे." स्वानंदच्या बोलण्यातून संस्कृत साहित्यावरचं त्याचं प्रेम आणि आत्मविश्वास झळकत होता.
-" रिअली?" टेबलवरचा पेपेरवेट हातात खेळवत देवाशिषने विचारलं.
- " ऑफ कोर्स्!" स्वानंदही सहजपणे बोलून गेला.
-" मग तूमच्या या साहित्यात शोधग्रंथही असतीलच, नाही का?" देवाशिषचा सुर आता गंभिर होत होता.
-" आहेतच! अनेक आहेत!"
-" मग एखाद्या प्राचीन शोधग्रंथात मॅमद्सबद्द्ल माहितीही असेलच!" देवाशिषचा शेवटचा पासा स्वानंदला चांगलाच भारी पडणार असं दिसलं.
-" असुही शकेल! काय सांगावे?" स्वानंदचा सूर जरा डळमळीत वाटला.
-"अस्सं?, ठीक आहे तर मग. मी आव्हान देतो तूला. आय चॅलॅंज यू प्राध्यापक स्वानंद कुलकर्णी, की संस्कृत साहित्याच्या व्यापकतेवर आपला इतका विश्वास असेल ना, तर मॅमद्स या साडेतीन हजार वर्षापूर्वी अस्तीत्त्वात असलेल्या प्राण्याबद्द्ल संस्कृत शोधग्रंथात काय नोंदी आहेत, त्याचा रिपोर्ट मला द्या!"
देवाशिषच्या तोंडून असल्या काही शब्दांची स्वानंदने अपेक्षाही केली नव्हती. क्षणभर तो सुन्नच झाला. मात्र थोडा वेळ विचार करून त्याने देवाशिषच्याच भाषेत त्याला सडेतोड उत्तर दिले.
-" ओके, डॉ. देवाशिष, मी आपलं आव्हान स्विकारलं. आजपासून बरोबर एक महिन्याने भेटू आपण."
-" दॅटस द स्पीरीट्!" स्वानंदचं कौतूक करीत देवाशिषने हस्तांदोलनासाठी हात त्याच्यापूढे केला. मात्र स्वानंदच्या मनात काहितरी वेगळाच विचार सुरू असल्याचं हेरायला त्याला जास्त वेळ लागला नाही.
-" का रे? आता काय झालं?"
-" देवाशिष, मी पूरेपुर प्रयत्न तर करीनच. पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. जर या कामात मी यशस्वी झालो, तर तूला आर्टस ला कमी लेखणे बंद करावे लागेल."
-" नक्कीच! मला माझ्या प्रॉजेक्टसाठी आर्टसचा उपयोग झाला, तर नक्कीच..." देवाशिषने मान्य केले
-" मग ठरलं तर." म्हणून स्वानंदनेही हात पुढे केला. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, व स्वानंदने देवाशिषचा निरोप घेतला. स्वानंद निघून गेल्यावर देवाशिषला पून्हा विचारांनी घेराव घातला. स्वानंदच्या हाती काही लागेल का? आपल्याला खरंच काहीतरी माहिती होईल का?...

स्वानंद! देवाशिषचा एकदम खास मित्र. अगदी खांदानी दोस्ती होती दोघांची. दोघांचेही वडिल एकमेकांचे पक्के मित्र. त्यांचीच परंपरा या दोघांनीही पूढे चालवली होती. दोघे दहावीपर्यंत बरोबर होते. स्वानंदचा भाषा, साहित्याकडे जास्त कल, तर देवाशिष विज्ञान आणि गणितात ऋची घेणारा. मुळ स्वभावामूळे दोघांनिही बारावीला वेगवेगळ्या शाखेत प्रवेश घेतला. तेव्हापासूनच या दोन मित्रांमध्ये आपापल्या शाखेच्या श्रेष्टकनिष्टतेबाबत संवाद होत्. त्यातूनच दोघांनाही अभ्यासाचा उत्साह येइ, आणि दोघेही जोमाने अभ्यासाला लागत. यातून अर्थातच दोघांचाही फायदाच होत गेला व अखेर आज हे दोघे यशाच्या शिखरावर जाऊन पोचलेले होते. देवाशिषने जीवशास्त्रात डॉक्टरेट घेतली होती, तर स्वानंद संस्कृत साहित्य आणि व्याकरणाचा गाढा अभ्यासक होता. सुदैवाने दोघेही पूण्यातल्या एकाच महाविद्यालयात आपापल्या विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच चर्चा होत. पैजा तर नेहमीच लागत. पण आज स्वानंदने स्विकारलेले आव्हान स्वानंदपेक्षा देवाशिषच्याच दृष्टीने फार महत्त्वाचे होते. कारण सध्या तो 'डिस्कवरी ऑफ वर्ल्ड मॅमद्स' या जागतीक चळवळीचा सन्माननिय भारतीय सदस्य होता. मॅमदस या समुळ नष्ट झालेल्या महाकाय प्राण्याच्या जिवशास्त्रीय संशोधनात तो महत्त्वाची भूमिका बजावत होता. सहाजीकच त्याचे घर व ईतर कौटुंबिक बाबिंकडे दुर्लक्ष होत होते. आधीच उशिर झालेल्या त्याच्या लग्नाला या मॅमदस प्रकरणामुळे अधीकच उशिर होत होता. त्यामुळे देवाशिषच्या घरच्यांबरोबरच स्वानंदही काळजीतच होता. अश्या परीस्थीतित स्वानंदने दिलेली माहिती देवाशिषला महत्त्वाची ठरणार होती. हे सगळं स्वानंदही जाणून होता, व आपल्या मित्रासाठी दिवसरात्र वाचन, चिंतन व टिपणे काढत होता.
ईकडे देवाशिषकडे विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे 'मॅमद्स्' बद्द्लच्या स्वाभाविक उत्सुकतेपोटी माहितीसाठी येत...
-" सर, मॅमदसबद्द्ल काही सांगा ना.."
-" ओके सुमारे साडेतीन चार हजार वर्षांपूर्वी, पृथ्वीवर अस्तीत्त्वात असणारे मॅमद्स हे आजच्या हत्तीसारखे दिसणारे, मोठाले सुळे असणारे शाकाहारी प्राणी होते. वातावरणात सतत होणार्र्या बदलांशी ते जूळवून घेवू शकले नाहीत, व समूळ नष्ट झाले. " देवाशिष सांगत होता.
-" जस्ट लाईक डायनासॉर्स ना सर?" एका चौकस विद्यार्थ्याचा प्रश्न.
-" हो. पण डायनॅसॉर्स नष्ट झाल्याची जीवशास्त्रीय कारणे आपण तेव्हाच शोधू शकलो, जेव्हा आपल्याला त्यांच्या हाडांचा संपूर्ण सापळा गवसला. रक्ताचे नमुने सापडले. कूठलेही जीव पृथ्वीवरून नष्ट का झाले, हे माहिती करण्यासाठी त्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. किंबहूना जोवर आपण त्यांना शास्त्रीयदृष्ट्या पुन्हा जीवंत करत नाही, तोवर त्यांच्या रहस्यांचा पत्ता आपल्याला लागत नाही." सरांच्या या उत्तराने प्रभावित झालेल्या तरूणाईने सहज प्रश्न केला...
-" मग हे शोधकार्य कोण करत आहे, सर?"
-" डिस्कव्हरी ऑफ वर्ल्ड मॅमद्स, ही डॉ. काझूफूमी गोटो या रशियन जीवशास्त्रज्ञाच्या नेत्रुत्त्वाखाली काम करणारी जागतीक संघटना हे कार्य करते आहे. आजवर रशियातील जीवघेण्या बर्फाळ गुहांच्या प्रदेशात, अतीदूर्गम, पहाडी भागात मोहीमा निघाल्या. पण दुर्दैवाने या महाकाय प्राण्यांच्या पुसटशी अस्तीत्त्वाची चाहूल देणार्र्या लहानसहान पूराव्यांशिवाय आजवर जास्त काही हाती लागले नाही. पण प्रयत्न मात्र सुरू आहेत. संस्थेचे ऑनररी मेंबर्स शोधमोहीम देखील काढू शकतात."
सर रंगात येऊन सांगत होते, तोच एका विद्यार्थिनीने त्यांची तंद्री भंग करून स्वानंद सरांचा निरोप सांगीतला.
-" एक्सक्युज मी सर, तूम्हाला कुलकर्णी सर बोलवत आहेत."
-" काय्? ओके फोक्स, डिटेल्स नंतर कधीतरी सांगीन, माझं काम जरा महत्त्वाचं आहे! येतो मी." देवाशिषने कसाबसा मुलांचा निरोप घेतला. व झपझप पावले टाकीत तो स्वानंदच्या केबीनकडे निघाला.पावलांच्या गतीबरोबरच त्याच्या मनातल्या विचारचक्रानेही गती घेतली.
-" स्वानंदने एखादी महत्त्वाची माहिती शोधली असणार! आपण त्यावर रिसर्च करू. मग काहितरी महत्त्वाची किल्ली प्राप्त होइल. मग आपण स्वतः शोधमोहिम काढू. त्यात सफलता प्राप्त झाली, तर...."
-" पण स्वानंदला काहिच गवसले नसेल तर? तर मॅमद्सचं भविष्य अंधारात. तसं झालं तर आपलंही भविष्य... एका सामान्य प्राध्यापकाचं जीणं आपल्याही नशिबी!"
हे व असे शेकडो विचार त्या काही मिनिटांच्या कालखंडात देवाशिषच्या मनात डोकावून गेले. तो वेगाने स्वानंदकडे जाउ लागला. जातांना अनेक विद्यार्थ्यांनी त्याला ‘गुड आफ्टरनून’ म्हटलं, अनेक प्राध्यापकांनी आवाज दिला. पण त्याचं लक्षच कुठे होतं? तो तर निघाला होता सरळ! झपाटल्यागत्!
-" सहर्ष सुस्वागतम देवाशिष महोदय्!" नेहमी प्रसन्न असणारा स्वानंद आजही आनंदी दिसत होता.
-" काय झालं?" न रहावून देवाशिषने विचारलं.
-" कूठे काय्?" स्वानंद हसत म्हणाला.
-" विनाकारण उत्सुकता ताणून धरू नकोस यार! काय झालं ते सांग ना लवकर..."
-" अरे काहीच तर झालेलं नाही, सगळा आनंदिआनंद आहे!" स्वानंद निर्विकारपणे म्हणाला. त्याच्या हातातल्या काही नोटस त्याने देवाशिषपूढे केल्या.
-" हे काय आहे?" देवाशिषने अधीरपणे विचारलं.
-" वाच. त्यावर काय लिहलंय ते वाच!" स्वानंद अजूनही शांतच होता.
-" परम्-गज! म्हणजे? हे काय नवीनच?" देवाशिषला अजूनही काहिच समजले नव्हते.
-" अरे बाबा, परम्-गज म्हणजे मॅमद्स्! ऋषी संहताच्या अरण्यातील दिर्घ वास्तव्यादरम्यान त्याला आलेल्या अनुभवांचं संकलन त्याने 'वन्यजीवसुंदरम्' या ग्रंथात केलेलं आहे, शिवाय प्रश्नोपनिषद आणि बृहद्-अरण्यकातही परम्-गजाचा उल्लेख आहे. एकूण मॅमद्सशी प्रचंड साम्य असणारे हे जीव, दूसर तीसरे कुणीही नसून मॅमदसच असावे, अशी मला खात्री आहे त्यांचं वर्तन, जीवन, खाद्य, रहाण्याची ठीकाणे..."
-" रहाण्याची ठीकाणे? ती कुठली सांगीतलीत?" स्वानंदला मध्येच थांबवत देवाशिषने विचारलं.
-" आता तीतकसं माझ्या ध्यानात नाही बघ. तू हे पेपर्स घेउन जा आणि वाच! मला जायला लागेल, माझं लेक्चर आहे आता..." स्वानंद निरोप घेउ लागला.
-" अरे पण मला हे संस्कृत कळणार कसं?" देवाशिषने मुख्य समस्या मांडली.
-" आपल्या बौद्धीक क्षमतेचा अंदाज आहे मला! काळजी करू नकोस. खाली शुद्ध मराठीत भाषांतर लिहलंय त्याचं. ते तरी समजेल ना?" स्वानंद मस्करीच्या मुडमध्येच होता.
-" थँक्स यार!" आणि पुन्हा झपाटल्यागत देवाशिष आपल्या लॅबकडे निघाला.
स्वानंदने आपलं काम केलं होतं. आता पाळी होती ती देवाशिषची. तोही तयार होता. ज्ञान आणि आत्मविश्वास दोघेही त्याच्याबरोबर एकत्र नांदत होते. तो काहीतरी नवीन करून दाखवणार, हे तर उघडच होते. त्याच्या हातून खरोखरीच असा काही शोध लागावा, म्हणून स्वानंद ईश्वराकडे मागणं मागणार होता. देवाशिषच्या आत्मविश्वासानं निघालेल्या पाठमोर्र्या स्वारीकडे कौतुकानं पाहतांना त्याच्या मनात हाच विचार सुरू होता.
ईकडे देवाशिष लॅबमध्ये बसून एकेका नव्या चमत्काराने चकित होत होता. पाच हजार वर्षांपूर्वी अस्तीत्त्वात असलेले परम्-गज आणि मॅमद्स्, यंच्यामध्ये पराकोटीचे साम्य होते. जणू काही परम्-गज हेच मॅमद्स असावेत! त्यांचे रूप रहाणीमान, सवयी ईत्यादिंचे हूबेहुब वर्णन वाचून देवाशिष थक्क झाला. मात्र या सगळ्या गोष्टी फक्त 'परम्-गज हेच मॅमद्स् होत' ही गोष्ट सिद्ध करू शकत होत्या. देवाशिष काहितरी नवीन शोधत होता. आणि एक वाक्य वाचतांना अचानक काहितरी गवसल्यागत तो ताडकन उभा राहिला. मॅमद्स्-बद्द्लचे साहित्य असणार्र्या लॉकरमधून काही स्लाईडस काढून त्याने त्या पटापट मायक्रोस्कोपखाली पाहिल्या.
"येस!' त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
त्या दिवसानंतर पंधर दिवसांची सुटी काढून तो बाहेरगावी गेला. तिथून परतताच त्याने आणखी दोन महिने रजा काढली. देवाशिषच्या या सुटी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्वानंदने त्याची भेट घ्यायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे तो संध्याकाळी देवाशिषच्या घरी होता. त्याने दिलेली बातमी ऐकून तर स्वानंदच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही.
-" स्वानंद, मी दिल्लीला गेलो होतो. तीथल्या सगळ्या फॉर्मेलिटीज पूर्ण केल्या. आता मी चाळीस दिवसांच्या शोध मोहिमेअंतर्गत आफ्रीकेत चाललोय!"
-" काय्? पण हे सगळं ईतकं अचानक! कसं काय शक्य झालं?"
-" अरे याचं सगळं श्रेय तुला आहे, मीत्रा. तुझ्या लेखातली ती गोष्ट मला क्लीक झाली आणि..."
-" कुठली गोष्ट?"
-" ते मी तुला आत्ताच नाही सांगु शकत. वेळ आली की तुला कळेलच! सध्या मला ईथे व्हीसाचं थोडं काम पूर्ण करायचंय तेव्हा मी निघतो. गुडबाय!" असं म्हणत देवाशिष निघालाही. स्वानंदच्या मनात अजूनही बरेच प्रश्न शिल्लक होते, पण ते आता दोन महिन्यांवर गेले होते.

त्यानंतर दोन महिन्यांपर्यंत स्वानंद व देवाशिष भेटले नाहीत. अधून मधून स्वानंदला देवाशिषचे फोन येत, व आमचा शोध सुरू आहे, एवढंच काय तो सांगे. मात्र या रहस्यमय वातावरणाने स्वानंदसह सार्र्यांचीच उत्सुकता ताणून धरली होती. अश्यातच एक दिवस बिबिसी वर बातमी झळकली... Indian Scientist solves ‘Mammads Mystery.’
" भारतीय जीवविज्ञान शोधकर्त्यांनी मॅमद्सचा संपूर्ण सापळा शोधला. लवकरच मॅमद्सचेही रहस्य उलगडणार!" ही सार्र्या देशासाठीच गौरवाची बाब होती. देशभर टिव्ही-चॅनल्स, वृत्तपत्रे, वेबसाईट्स सर्व प्रसिद्धीमाध्यमांनी मोहीमेवर गेलेल्या शास्त्रज्ञांचा उदो उदो चालवला होता. डॉ. देवाशिष देशमुखचं नाव तर सगळीकडे झळकत होतं. आणि अश्या उत्साही वातावरणातच यशस्वी वैज्ञानिकांचं स्वदेशी आगमन झालं! मुंबई विमानतळावरच्या जंगी स्वागताबरोबरच अभिनंदनाचे बुके आणि शुभेच्छांचे संदेश स्विकारून दमलेला देवाशिष रात्री अकरानंतर जरा मोकळेपणा अनुभवू लागला होता. तोच स्वानंद तीथे पोचला.
"देवाशिष!" लाल फुलांचा एक भलामोठा बुके हाती घेऊन उभ्या असलेल्या स्वानंदने प्रसन्नतेने हाक दिली. देवाशिषने झटकन मागे वळून पाहिले. क्षणभर तर ते दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. हातातला बुके पुढे करत स्वानंद म्हणाला, "अभिनंदन्!" आणि दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिले.
-" देवाशिष मला तूझ्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आहे! "
-" मलादेखील तूला खूपकाही सांगायचं आहे! "
-" सांग. अगदी सविस्तर सांग. तू मुंबईहुन दिल्लीला, तीथून एकदम आफ्रीकेत गेलास कसा ? परम्-गजाचा सापळा कसाकाय सापडला?, सगळं सगळं...." आता स्वानंदला धिर धरणे शक्यच नव्हते.
-" ठीक आहे. तूला अगदी सविस्तर सांगतो. ऐक. त्या दिवशी तू काढून दिलेल्या नोटस वाचतांना मला परम्-गज गुहेत राहतात अशी माहिती मिळाली. मी आजवर सापडलेल्या पुराव्यांचा अभ्यास केल्यावर मला तशी शंका होतीच, पण तेव्हा खात्रीच पटली. मी सगळ्या स्लाईडस पुन्हा एकदा मायक्रोस्कोपखाली पाहिल्या आणि गुहावासि जनावरांची सर्व लक्षणे मॅमद्सच्या अवशेषांत असल्याचे मला आढळले. ही माहिती डॉ. काझुफुमींना कळवली. बर्फाळ प्रदेशातील महकाय गुहांमध्ये त्यांचे शोधकार्य अनेक महिन्यांपासून सुरूच होते. त्याला वेग आला. मात्र बर्फाळ गुंफांमध्ये काहिच विषेश आढळले नसल्याने मॅमद्स गुहावासि नसावेत; अशीही शंका त्यांनी माझ्याकडे वर्तवली. विज्ञान एकदा चूकीचा अंदाज वर्तवेल; मात्र प्रत्यक्ष अनुभवांचं कथन असलेलं साहित्य चूक असुच शकत नाही. मला मॅमद्स गुहावासि असल्याची अगदी एकशे एक टक्के खात्री झाली होती. तेव्हा आता मॅमदस राहू शकतील अश्या महाकाय गुंफा कुठे असतील याचा शोध मी सुरू केला... आता एवढ्या मोठ्या गुहा जंगलांत सापडणे तर अशक्यच! तेव्हा अश्या गुहांचा शोध घेण्यासाठी प्रसिद्ध भूशास्त्र-अभ्यासक डॉ. मुग्धा जोशींची मदत घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला ईतक्या महाकाय गुंफा म्हणजे बर्फाळ प्रदेशातील हिमगुंफाच असु शकतील, असं त्यांनी सांगीतलं; पण बर्फाळ प्रदेशात जास्त काही गवसले नसल्याचे सांगीतल्यावर त्यांनी ज्वालामुखी गुंफांचा पर्याय पुढे केला..." देवाशिष सारा घटनाक्रम सांगत होता.
-" ज्वालामुखी गुंफा?" समाधी लागल्यागत अवस्था झालेला स्वानंद नकळत बोलून गेला.
-" सांगतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाला की, तप्त लावरस ओहोळांमध्ये नदीच्या पाण्यासारखा वाहतो. ज्वालामुखीच्या केंद्रापासून दूर जातांना हा लावा थंड व्हायला लागतो. सहाजीकच वातावरणाशी सरळ संपर्क येत असल्याने लाव्याचा वरचा थर हा लवकर थंड होतो, आणि त्याखालच्या लाव्याचा थंड वातावरणाशी संपर्क न आल्याने तो तप्तच राहतो. दुधावर साय जमा होते ना, तसला हा प्रकार. कालांतराने खालच्या खदखदत्या लावारसातील वाफेमुळे वरचा थंड झालेला थर आणखी वर लिफ्ट केला जातो. दुध ऊतू जाते, त्याप्रमाणे. मात्र हा लावा कितीही वर जाऊ शकतो कारण याला दुधाप्रमाणे भांड्याच्या सिमेचे बंधन नसते. असे अनेक वर्षे झाल्यावर, ज्वालामुखी शांत झाला, की खालचा व वरचा दोन्ही थर लाल जांभ्या खडकांत रुपांतरीत होतात. आणि वाफ निघून गेल्याने मधली पोकळी मात्र तशीच राहते. या पोकळीतच सजीव वास्तव्य करतात."
-" विश्वासच बसत नाही रे! काय निसर्गाची किमया आहे!"
-" अरे खरी किमया तर पुढे आहे! आता असल्या महाकाय ज्वालामुखी गुहेत मॅमद्स राहिले असतील; असं आम्हाला वाटलं. आफ्रीकेव्यतीरिक्त दक्षीण अमेरीकेतही महाकाय ज्वालामुखी गुंफा सापडल्या असत्या, पण सदाहरीत जंगले असलेल्या आफ्रीकेतच मॅमद्ससारखे शाकाहारी सजीव राहिले असावेत असा माझा जीवशास्त्राचा अभ्यास सांगत होता. तेव्हा पहिला खडा आफ्रीकेवरच मारून पहायचा असं ठरलं. तीथेही 'डिस्कव्हरी ऑफ वर्ल्ड मॅमद्सचे' सदस्य लोक होतेच. त्यांच्या मदतीने आम्ही त्या महाकाय गुहांमध्ये शोधकार्याची परवानगी काढली. वन्यजीवनाला कसलाच धोका पोचू न देता आणि पर्यावरणाची कसलीच हानी न करता जे काही करता येइल ते करा; अशी स्पष्ट परवानगी तिथल्या सरकारने दिली. खरं म्हणजे भरदिवसाही मध्यरात्रीसारखा अंधार असणार्र्या या गुंफांमध्ये शोधकार्य करणे म्हणजे अवघडच काम होतं, पण डॉ. मुग्धाने आमच्याबरोबर मोहिमेवर येण्याची तयारी दाखवली. त्यांच्या भुशास्त्राच्या अनुभवाचा फायदा आम्हाला वारंवार झाला.अगदी नेमक्या ठीकाणीच खोदकाम करून आम्ही हव्या असलेल्या आकाराच्या अठरा गुहा पहिल्या आठवडाभरातच शोधून काढल्या. त्यात ठरावीक वॅटच्या वर प्रकाशयोजना करणे शक्य नव्हते, त्यामुळे जवळजवळ अंधूक प्रकाशातच आमचा शोध सुरु झाला. दररोज संध्याकाळी कोसळणारा मुसळधार पाऊस, भरदिवसाही पसरलेला काळोख पाहून कधीकधी वाटायचं की, आपण अंधारात तर तीर चालवत नाही ना?, पण एखाद्या दिवशी एखाद्या गुहेतून अनाहुतपणे निरोप येइ,'अमुक एक अवशेष सापडला; तमुक एक हाडाचा तुकडा आढळला! या लहान-सहान सफलतांनी आशेचा दिप तेवत ठेवला. आणि नंतर नशिबाने जास्त परिक्षा पाहिली नाही. चाळीस दिवसांच्या मोहीमेची मुदत संपायच्या तीन दिवस आधीच आम्हाला मॅमद्सचा एक संपुर्ण सापळा गवसला. सततच्या कष्टाने आलेला थकवा कुठच्या कुठे पळून गेला! मॅमद्सचा तो सापळा व्यवस्थीतपणे मॉस्कॉला पाठवला. टिममधल्या काहिंनी तर उत्साहाने त्या सापळ्याबरोबर फोटोही काढून घेतले. काहिंनी प्रतिरूप प्लास्टरचे सापळे तयार केले. मॅमद्सच्या रक्ताच्या नमुन्यांसाठी आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. हजारो वर्षांपासून त्या गुहेत गुढ वास्तव्याला असलेल्या किटकांच्या रक्ताच्या नमुन्यापासून आम्हाला ते सहज प्राप्त झाले. स्वानंद आता आपल्याला कळू शकणार आहे की, मॅमद्स का नष्ट झाले?, कसे नष्ट झाले?, आणि आपली कुठली निशाणी मागे सोडून गेले!" देवाशिष भारावून बोलत होता. स्वानंदसारख्या पंडितालाही आता शब्द सुचेनासे झाले होते.
-" स्वानंद, तू तयार करून दिलेल्या पायव्यावरच आज हा ईतका मोठा यशस्वीतेचा महाल उभा राहिलेला आहे. ईतक्या विशाल सफलतेमागे माझ्या जीगरी दोस्ताचा सिंहाचा वाटा आहे, असे उद्या पत्रकार परिषदेत जाहिर करीन तेव्हा मला किती समाधान वाटेल! खरंच स्वानंद, तू म्हणत होतास तेच खरं. मी ऊगाच आपल्या विज्ञानाची प्रौढी मिरवत होतो. आज मला मान्य आहे! कुठलंच शिक्षण कमी जास्त नसतं."
-" देवाशिष, अरे फक्त माझ्यामुळे नाही, आणि तुझ्यामुळे देखील नाही. संस्कृत, जीवशास्त्र, आणि भुशास्त्र या तीनही शास्त्रांचा त्रीवेणी संगम या ठीकाणी घडून आला, तेव्हा हे यश हाती लागलं. प्रत्येक शास्त्रात काहितरी करून दाखवण्याची शक्ती आहे. मग तीन शास्त्रे एकत्र आल्यावर काय अशक्य आहे?" स्वानंद नेमक्या शब्दात बोलून गेला.
-" देवाशिष, या यशाची तीसरी महत्त्वाची मानकरी डॉक्टर मुग्धा. यांना मला भेटायचंय्. बोल, कधी भेट घडवतोस्?" स्वानंदने विचारलं.
-" म्हणत असशिल तर आत्ताच!"
देवाशिषही सहज बोलून गेला...
-" सौ. मुग्धा देवाशिष देशमुख; जरा बाहेर येता का प्लिज!"


चैतन्य स. देशपांडे
माउली, प्लॉट नं १०बी
राजे संभाजी नगर, यवतमाळ
Chaitany1@yahoo.co.in