Tuesday, May 1, 2007

प्रतीरुप

क्लीनिकमधून घरी परतून मी नुकताच फ्रेश झालो होतो. थोडं रीलॅक्स होउन सोफ्यावर विसावत नाही, तोच दारावरची बेल वाजली.
"साहेब, एक पेशंट आहे." दार उघडून मोहनने पाहिलं होतं
"त्याला माहिती नाही माझी भेटण्याची वेळ?" दारातल्या माणसाला एकायला जाईल ईतक्या मोठ्या आवाजात मी बोललो.
"डॉक्टरसाहेब, मी श्रावण!" दारातली व्यक्तीही तेवढ्याच मोठ्याने पण थोड्या करुण स्वरात म्हणाली.
"श्रावण? या वेळेला?" मला मोठा प्रश्न पडला.
"अरे ये श्रावण, ये ना." मी सोफ्यावर जरा सावरून बसलो. श्रावण झपझप चालत आत आला. त्याचे केस विस्कटलेले होते, शर्टाची दोन तीन बटणं तूटलेली. नक्कीच कुठेतरी भांडण करुन आलेला असावा.
"श्रावण काय हा अवतार?" मी समोरच्या टेबलावरचा पाण्याचा ग्लास त्याच्यापूढे केला. त्याने तो क्षणार्धात रीता केला. अचानक विज संचारल्यागत त्याने आपले दोन्ही हात कोपरापासून जोडले. माझ्या पायाशी जवळजवळ गडाबडा लोळण घेत तो ओरडू लागला.
"डॉक्टरसाहेब मला मरायची गोळी द्या. मला मरायचं आहे... स्वेच्छामरण!"
"श्रावण, काय हे? सांभाळ स्वतःला! बस ईथे शांत आणि काय झालं ते सांग बघू मला." मी त्याला उठवून सोफ्यावर बसवलं.
"डॉक्टरसाहेब, मी पागल झालो आहे. हा पागलपणा जगु देत नाही, अन घरचे लोक मरु देत नाही!" आणि असंच काहीबाही बरळून तो ढसाढसा रडू लागला.
"श्रावण, कोण म्हणालं तूला, तू पागल आहेस म्हणून?"
"मीच म्हणतो, डॉक्टरसाहेब, मी पागल आहे!"
"आधी तू शांत हो. तू सांगीतल्याशीवाय थोडीच कळणार आहे काय झालं तर?" मी त्याला धीर दिला.
"डॉक्टरसाहेब, मला कुणी मारलं माहीती आहे?"
"कुणी?"
"प्रेटी होम सुपर शॉपी वाल्यांनी"
"काय? त्यांनी कश्याला मारलं तूला?"
"त्यांचं म्हणणं होतं, की मी चार दिवसांपूर्वी त्यांच्याकडे व्हॅक्यूम क्लीनरची ऑर्डर दिली."
"तू दिलीस का?" मी विचारलं.
"नाही, पण त्यांनी मला कागदपत्र दाखवले. त्यावर माझीच सही. माझंच अक्षर. माझाच अकाउंट नंबर. मला पाच हजार मागीतले त्यांनी!"
"पण याचा अर्थ तू ऑर्डर दिलीस." मी थोडा गोंधळलो.
"नाही हो डॉक्टर! मी कश्याला म्हणून देउ ऑर्डर? बरं कॅन्सल करा म्हणालो, तर डेट गेली म्हणे त्याची!आता पैसे द्यावेच लागणार,असं म्हणाले. त्यातूनच थोडी बाचाबाची अन मग भांडण.."
"पण श्रावण त्यांच्याजवळ कागदपत्र आहेत."
"डॉक्टरसाहेब, मी या पागलपणामुळे आधीच त्रस्त. त्यात घरी काय कमी भानगडी आहेत का? मी कश्याला देउ व्हॅक्युम क्लीनरची ऑर्डर? फूकटचे पाच हजार?" श्रावणचा गळा भरून आला.
"श्रावण स्वतःला पागल म्हणवून घेवू नकोस."
"पागल नाही तर काय म्हणू डॉक़्टर? मी कधी जाउन ऑर्डर दिली ते मलाच आठवत नाही! म्हणजे तसं काही मी केलंच नाही. अजूनही आठवत नाही!"
"श्रावण यू आर व्हेरीमच कॉम्प्लीकेटेड्!"
"आय ऍम मॅड!" त्याने आपले विस्कटलेले केस मुठीत धरून ओढले.
"बास झालं आता. बंद कर वारंवार स्वतःला पागल म्हणवणं. मी देउ का पाच हजार? जाउन मार त्या सुपर शॉपी वाल्यांच्या तोंडावर अन खतम कर हा किस्सा." मी कपाटातलं चेकबूक काढलं.
"पैसे देउन किस्सा खतम होइल डॉक्टर, पण प्रकरण मिटेल का? मला काय झालंय ते समजेल का?" तो त्रस्त झाला होता.
"श्रावण, सध्या तू विचारचक्र थांबव. हे पैसे कॅश करून घे अन त्यांना देउन दे. तूझ्याबद्द्ल आपण उद्या क्लिनीकमध्ये बोलू."
"पण..." पैसे घेणं श्रावणला प्रशस्त वाटत नव्हतं, पण त्याचा नाईलाज होता.
"काळजी करू नकोस. जा. उद्या दूपारी क्लिनीकला ये. आपण बोलू. ठीक आहे?" मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"उपकार झाले तूमचे..." श्रावणचे डोळे पाणावले. स्वतःला सावरत तो दारापाशी गेला. पायात चपला सरकवून तो जड पावलांनी निघून गेला. त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतांना माझ्या मनात श्रावणच्या पहिल्या भेटिपासूनच्या सर्व प्रसंगांनी गर्दी केली.
'श्रावण हरीपंत खोत.' वय असेल सत्तावीस-अठ्ठावीसच्या आसपास. एमकॉमपर्यंत शिक्षण घेउन एका खाजगी फर्ममध्ये अकाउंटंट म्हणून लागला. त्यानंतर सहाएक महिन्यांनी माझ्या क्लिनीकमध्ये आला होता. तेव्हा तो जरा घाबरल्यासारखा वाटत होता. तसंही सामान्य माणसं मानसोपचार तज्ञाकडे घाबरतच येतात. श्रावणला त्याचा प्रॉब्लेम विचारला. माझ्या नेहमीच्या पद्ध्तीने त्याच्याकडून हवी ती माहिती काढून घेतली.
"समज आल्यापासून मी असाच आहे, डॉक्टर. अनेक चमत्कारीक घटना घडल्यात माझ्या आयुष्यात. संध्याकाळी तात्या मला पाढे आणि शुभंकरोती म्हणायला घरी जबरीने बसवून ठेवत. तेव्हा मला मित्रांबरोबर आमराईत जावंसं वाटायचं. ईतकं, की शुभंकरोती साठी हात जोडून, डोळे लावून मी आमराईचाच विचार तासन् तास करीत रहायचा. आणि एक दिवस अचानक आमराईचा चौकीदार घरी सांगत आला...
-"खोतमास्तर, पोराला सांभाळा. रोजरोजचं हे कैर्या तोडणं किती दिस बघायचं आम्ही. यापूढं आमराईत दिसला त्, हात चालन माझा."
तात्याना त्याचा खूप राग आला. त्याचं बखोटं धरून त्यांनी त्याला देवघराजवळ आणलं. आणि दाखवलं...
-"हे बघ, मुर्खा... माझा मुलगा ईथं देवघरात बसलाय मघापासून."
पण चौकीदार हे मानायला राजी होई ना. त्यानं मलाच आमराईत पाहिलं होतं. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास होता, व तात्यांचा वास्तवावर. मात्र तोही खोटा बोलत नव्हता, कारण त्यानंतर एकदा मित्र मला म्हणाले..
-"श्रावण, तू येत जाउ नकोस आमराईत. आमच्यासारखं चपळाईनं तूला पळता येत नाही, आणि मग आम्हीच सापडतो उगाच!"
-"अरे,पण मी कधीच आमराईत येत नाही."
-"खोटारड्या, रोज आमच्याही आधी हजर असतोस तीथे." आणि सगळे मला 'खोट्या..खोट्या' म्हणून चिडवू लागले.
गावात मग मी अनेक ठीकाणी दिसू लागलो. कधी विहिरीवर, कधी उसाच्या शेतात तर कधी पारावरच्या गावदेवीच्या मंदिराच्या मागे भूताच्या वाडीत; आणि या सर्व वेळांना मी घरीही असायचो. पाढे म्हणत..डोळे मिटून शांतपणे शुभंकरोती म्हणत..."
गावात राहेनासे झाल्यावर शहरात आलो. सातवीनंतर शहरात हॉस्टेलवर राहिलो. दहावीपर्यंत दिवस मजेत गेले. मग कॉलेजमध्ये पून्हा हेच!" श्रावण अगतीक होउन सांगत होता.
खरोखरीच श्रावणचं आयुष्य म्हणजे एक अजब रहस्यमय गोष्ट होती. मी, डॉ. निशिकान्त राणे; गेल्या जवळजवळ वर्षभरापासून ही केस हाताळत होतो. मी. नामवंत मानसोपचारतज्ञ! पण श्रावणपुढे मानसशास्त्राचे सारे नियम मर्यादीत ठरत होते. त्याच्या केसचा सुरुवातीचा स्ट्डी केल्यावर मला ही केस साधारण मल्टीपल परसनॅलीटी डिसॉर्डर किंवा डिसोशिएटीव आयडेंटीटी डिसॉर्डरची असल्याचं जाणवलं. अश्या केसेसमध्ये रूग्ण एखाद्या तिव्र मानसिक ईच्छेच्या किंवा व्यक्तीमत्त्वाच्या प्रभावाखाली येउन एखादं कृत्य करून जातो, आणि नंतर नॉर्मल झाल्यावर आपण काय केलं ते विसरून जातो. हल्ली असल्या केसेसचा स्टडी मोठ्या प्रमाणावर केला जाउ लागला आहे. मला जाणवलं, की कदाचीत घरची परिस्थीती जेमतेमच असल्यामूळे श्रावणच्या अनेक ईच्छा मनातल्या मनातच राहील्या, त्यामुळे त्या पुर्ण करण्यासाठी तो एखाद्या वेगळ्या व्यक्तीमत्त्वाच्या पगड्याखाली येउन एखादे काम करीत असेल, आणि नॉर्मल झाल्यावर ते सर्व विसरून जात असेल. म्हणून मी त्या दृष्टीने श्रावणशी चर्चा करून पाहिली.
"छे! ईच्छा अपुर्ण राहण्याचा प्रश्नच नाही, डॉक्टर. घरची परिस्थीती साधारणच असली तरी, मी एकूलता एक मुलगा! त्यामूळे सहाजीकच माझे सर्व वाजवी हट्ट, ईच्छा पुरवल्या गेल्या. आणि सातवीपासून तर मी हॉस्टेलवरच! आपल्या मनाचा राजा! त्यामूळे ईच्छा अपुरी राहिल्यामूळे मी असा वागत नाही डॉक्टर!"
"हे ईतक्या विश्वासाने कसाकाय सांगतोस श्रावण?" मी जरा खोलात जायचं ठरवलं.
"कॉलेजला होतो तेव्हाचा किस्सा सांगतो, डॉक्टर. मी बिकॉम फायनलला असतांनाचा. खान म्हणून एक पार्टटाईम लेक्चरर होता आम्हाला. आणि श्वेता वर्मा नावाची मुलगी होती वर्गात. तीचं अन त्या खानचं सूत जूळलं होतं. दोघे रोज कॉलेजनंतर कॅँपसमागच्याच बागेत भेटायचे. आम्ही त्यांना रंगेहाथ पकडायचं ठरवलं होतं, पण वेळेवर खानच्या हातात अकाउंटींगचे कॉलेज मार्क असल्याचे समजताच अर्धा ग्रुप ही मोहीम सोडून गेला. त्यांच्यातच मीही एक होतो. रूम मध्ये शांत बसून आम्ही सारेजण खानला पकडायला गेलेल्या मुलांबद्दल विचार करत होतो. आपण त्यांच्याबरोबर गेलो असतो, तर काय झालं असतं त्याची कल्पना मी करत बसलो. दूसर्र्र्याच दिवशी कॉलेजमधून आठवडाभरासाठी रस्टीकेट झालेल्या मुलांमध्ये माझं नाव होतं. खूप भांडलो. पण शेवटी तिथल्या मुलांनीच माझ्या नावाची कबूली दिली. आणि माझ्या रूममधली मुलं सांगत होती की, मी रूममध्येच होतो. म्हणजे मी एकाच वेळी दोन ठीकाणी होतो, डॉक्टर!"
"ही भूताटकीची केस आहे की काय्?" मी तेव्हा सहजपणे बोलून गेलो होतो, पण आताशा माझ्या या वाक्यात तथ्य असल्याचा भास होउ लागला होता.
'आज श्रावण ने व्हॅक्युमक्लीनरची ऑर्डर दिली नव्हती, तरीही त्यानेच ती दिली होती' अशी परिस्थीती निर्माण झाली होती. श्रावणचा कुणी जूळा भाउ? श्रावणसारखाच दिसणारा दूसरा कूणी? एकाच चेहर्र्याची बारा माणसं जगात असतात असं म्हणतात...
या आणि अश्या शेकडो शंकांनी माझ्या मनात घर करणं सुरु केलं. पण मग श्रावणच्या लहानपणापासूनच्... छे! मला काही सूचेनासं झालं होतं!
एक माणूस. दोन ठीकाणी. एकाच वेळी!.... विचार करतच मी झोपी गेलो.

त्या दिवशीनंतर आठ पंधरा दिवस श्रावणची अन माझी भेट झाली नाही. चार पाच दिवसांनंतर त्याच्या बाबतीत घडलेला एखादा किस्सा तो पूर्वी कळवायचा. एखाद्या दिवशी तो त्याच्या मुळगावी फिरतांना तीथल्या लोकांना दिसायचा. तर कधी ऑफीसच्या वेळातच घरी येउन आपल्या खोलीत कॅरम खेळत बसायचा. श्रावणच्या आईनं त्याला ऑफीसटाईममध्ये घरी परततांना पहिलेलं असलं, तीने त्याची चौकशी केलेली असली, तरी परत जातांना कधीच पाहिलं नाही. संध्याकाळी नेहमीच्या वेळेवर श्रावण घरी परतला, की पून्हा घरी धर्मयुद्ध. "दूपारी न सांगता का म्हणून निघून गेलास?"... असले काही प्रसंग घडले, की श्रावण मला आवर्जून कळवत असे. त्याच्या दूहेरी उपस्थीतीच्या एकेक कथा ऐकून माझं डोकं भंडावून गेलं होतं. श्रावणला मात्र आता याची सवय झाली होती. एकदा तो मला म्हणालाही होता...
-"हे असं दूहेरी वागणं माझ्या हातात असतं ना, डॉक्टर, तर मी एकाच वेळी दोन ठीकाणी नोकरी केली असती"...
सकाळपासून माझ्या कानात श्रावणचं हेच वाक्य वारंवार घूमत होतं. हे असं दूहेरी वागणं श्रावणच्या हातात असू शकतं का? त्याच्या मनाप्रमाणे तो असं का वागू शकत नाही? कदाचीत आज आपल्याला काहीतरी गवसणार आहे, असं वाटलं. श्रावणचं दूहेरी अस्तीत्त्व त्याच्या मनाच्या मर्जीनूसार असू शकत नाही का?, या एकाच विचाराने मला पूरता घेरला. माणसाच्या प्रत्येक कृतीला प्रत्यक्षात येण्याआधी मेंदूच्या आज्ञेची आवश्यकता असते.श्रावणच्या दूहेरी अस्तीत्त्वाला मेंदूची आज्ञा नसावी? नक्कीच असणार्! श्रावणला बोलवायला हवं! मी क्षणार्धात माझ्या मोबाईलवरून त्याचा घरचा नंबर डायल केला.
"हॅलो, श्रावण आहे का?"
"बोला डॉक्टर, मीच बोलतोय!"
"अरे आठ पंधरा दिवस झाले, काही फोन नाही, भेट नाही.."
"अरेच्या, तूम्हाला फोन केलाच नाही ईतक्यात!"
"बरं त जाउ दे, दूपारी काय करतोयस?"
"घरीच असतो एवढ्यात.."
"कसा काय? बरं ते जाउ दे! घरीच असशील तर ये ना क्लीनिकवर दूपारी तीनेक वाजता."
"पोचतो." मोजकंच बोलून श्रावणनं फोन ठेवला. त्याच्या केसची कागदपत्र मी नव्याने गोळा केली. वर्षभराच्या अभ्यासाने ती मला पाठच झाली होती, तरीदेखील पुन्हा एकदा शांत डोक्याने ती वाचायचं मी ठरवलं. श्रावणच्या लहान पणापासूनचा एकेक किस्सा वाचतांना मला त्यात एक समानता दिसू लागली. एक कॉमन गोष्ट...
"मी आत येउ डॉक्टर?" या वाक्यासरशी माझ्या मागच्या भिंतीवरच्या घड्याळातली मुलगी बाहेर आली, व तीने टेप केलेली नेहमीची शीळ वाजवली. पाठोपाठ टण ट्ण ट्ण तीन टोले पडले. श्रावण दारात उभा होता. आज त्याने फीकट गूलाबी रंगाचा प्लेन शर्ट आणि काळा पॅन्ट घातला होता. ओठावर मी कधीच न पाहिललं हसू होतं. डोळ्यात अभूतपूर्व चमक! व चेहर्यावर एक वेगळाच आत्मविश्वास माझ्या नजरेनं हेरला.
"श्रावण, तूच ना?" मी चकीत होउन त्याच्याकडे बघतच राहिलो.
"हो डॉक्टर, मीच श्रावण." मोकळेपणानं हसत तो माझ्यासमोर बसला. बरोबर आणलेली कसलीतरी वस्तू त्यानं बाजूच्या खूर्चीवर ठेवली.
"काय श्रावणराव? आज एकदम फॉर्ममध्ये गाडी!" मी त्याला नखसिखान्त न्याहाळत बोललो.
"डॉक्टर, चिंता मिटली ना माझी! मोकळा झालो मी!" श्रावणच्या या वाक्यांनी मी अधीकच बूचकळ्यात पडलो.
"व्हॉट डू यू मिन? श्रावण, आता काय झालं पून्हा?"
"नाही, चिंता नको डॉक्टरसाहेब. मी मोकळा झालो म्हणजे अगदी सर्व त्रासांतून्, व्यापांतून! आता रोज सकाळी उठणं नाही, लोकलमागे धावणं नाही, दगदग नाही, काम नाही, आणि... आणि नोकरीही नाही!" श्रावणने मोठा रहस्यभेद केला.
"काय? नोकरी सोडलीस तू?" मला धक्काच बसला.
"नाही, मला काढून टाकलं. कायमचं." श्रावणचा चेहरा मात्र प्रसन्नच! जसाच्या तसा.
"श्रावण काय बोलतोस काय हे? म्हणजे तूझ्या दूहेरी अस्तीत्त्वाचा काहीतरी..."
"अगदी बरोबर डॉक्टर. त्यामूळेच नोकरी गेली माझी."
"आणि तू ईतका शांत?" मला श्रावण जीवाचं काही बरंवाईट करेल, अशी शंका आली.
"हो, आता मी शांतच राहणार आहे, डॉक्टर..."
"आत्महत्येचा विचार जरी मनात आणलास ना, तर माझ्यासारखा वाईट नाही..." मी त्याला मध्येच थांबवत मी बजावलं.
"छे छे! नाही... शक्यच नाही. आता माझ्या आयुष्याचं लक्ष वेगळं!" श्रावणच्या डोळ्यात आत्मविश्वास होता. " असं कोड्यात बडबड करण्यापेक्षा काय ते सरळ सांग ना एकदाचं." आता मला वैताग आला होता. "डॉक्टर, गेल्या वर्षभरापासून आपण ज्या रहस्याचा उलगडा करू पहातोय,तो मला आठ दिवसांपूर्वीच झाला."
"श्रावण?!"
"सांगतो डॉक्टर. मला त्या दिवशी नोकरीवरून काढून टाकलं होतं. कारण... कारण... मी माझी ऑफीस कलीग, मीस श्रृतीका... श्रृतीका पाठक... वर... जबरदस्ती.."
"व्हॉट द हेल आर यू टॉकींग, श्रावण? शुद्धीवर आहेस ना?" मी ताड्कन उठून उभा राहिलो.
"रिलॅक्स डॉक्टर!'ईतके दिवसांत पहिल्यांदाच श्रावण मला धीर दे होता..
."आणि त्याच वेळी मी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये शांत बसून कॉफीची वाटही बघत होतो, डॉक्टर." श्रावण शांत होता.
"म्हणजे?!""म्हणजे उघड आहे, डॉक्टर. मी स्वतः कॅन्टीनमध्ये होतो, आणि माझं दूसरं रूप श्रृतीका पाठकच्या केबीनेमध्ये."
"काय?"
"होय डॉक्टर... या आरोपाखाली मला ताबडतोब रस्टीकेट केलं गेलं. प्रचंड टेन्स होउन मी घरी परतलो. माझ्या खोलीचं दार आतून लावून घेतलं आणि ढसाढसा रडू लागलो. माझ्या मनात विचार आला, श्रृतीका पाठकच्या केबेनमध्ये तर आपण नव्हतोच... म्हणजे दूसराच कूणीतरी होता. आपल्यासारखाच दिसणारा, आपल्यासारखाच भासणारा, कोण असावा? असेल तर त्यानं समोर यावं! एकदाच मला दिसावं! माझ्याशी बोलावं! मी सतत तिव्रतेनं हाच विचार करत होतो, डॉक्टर, आणि अचानक... अचानक माझ्यासमोर उभा राहिला तो! तो म्हणजे.. मीच!"
"अमेझींग!" माझ्या तोंडून नकळत उदगार निघाले.
"डॉक्टर, मी त्याला हात लावला, त्याच्याशी बोललो! त्याला पुन्हा पुन्हा खोदून खोदून त्याच्याबद्दल विचारलं. तो म्हणजे मीच होतो. माझाच एक भाग." श्रावण भारावून सांगत होता.
"डॉक्टर, काळानुरुप माणसाचा मेंदू विकसित होतो आहे. त्यावर विविध विषयांचे हजारो सेन्सर्स आहेत. पिढ्यानपिढ्यांपासून हळूहळू ते जागृत होत आहेत. सध्या आपण फक्त आठ टक्केच मेंदूचा वापर करतो. हळूहळू वापर वाढेल. मेंदू विकसित होईल! खरं ना?"
"अगदी खरं." उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार श्रावणचा शब्दनशब्द खरा होता.
"डॉक्टर, माझ्या मेंदूचं ईच्छाशक्तीचं सेन्सर जागृत झालेलं आहे. मी जेव्हा एखाद्या वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनेबद्द्ल शांतपणे, एकाग्रतेने, आणि तीव्रतेने विचार करतो, तेव्हा ती गोष्ट जीथे प्रत्यक्षात साकार होत असेल्, तेथे मी पोचतो... नव्हे, माझं प्रतीरूप तीथे पोचतं."
"श्रावण तू काय बोलतोयस मला काहिच कळत नाही!" मी श्रावणपूढे हार मानली.
"समजून घ्या डॉक्टर! त्यानं, माझ्या प्रतीरूपानं प्रत्यक्ष येउन मला हे सांगीतलं आहे. माझ्याशी संबंध असलेल्या, व सद्य स्थीतीत घडत असलेल्या एखाद्या घटनेबद्द्ल मी तीव्रतेने विचार केला, की माझं ईच्छाशक्तीचं सेन्सर जागृत होतं. माझ्या शरीरातून विशिष्ठ प्रकारची किरणं उत्सर्जन पावतात. ती एकत्र येउन माझ्या शरीराची त्रीमीतीय आकृती तयार करतात. आणि मग हे नवं शरीर.. माझ्या मनात जे असेल ते करायला जातं. ते करतंही, आणि माझी तंद्री भंगली, की परत वातावरणात मिसळून जातंही" श्रावण भरभरून बोलत होता.
"हे तर आठवं आश्चर्य आहे, श्रावण!"
"नाही, डॉक्टर, आश्चर्य नाही, हा मेंदूच्या विकासाचा एक टप्पा आहे. आज काही कोटींमध्ये दोन तीन माझ्यासारखे लोक आहेत. कालानुरुप ते वाढतील. जसजसा मेंदू विकसित होईल, तसतसे ते अधीक सामर्थ्यवान होतील."
"मला पटतय श्रावण, तूझं म्हणणं. वैध्यकशास्त्र शिकतांना आम्हाला सांगीतलं जातं, की मानवी मेंदू ही जगातली सर्वांत जास्त गुंतागुंतीची रचना आहे. मेंदूच्या प्रत्येक रहस्याचा उलगडा होणे, ही तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे. त्याचे सामर्थ्य मात्र अपार आहे. आज मेंदूच्या ईच्छाशक्तीने प्रेरीत होउन शरीरातून विशिष्ट प्रकारची किरणं उत्सर्जीत झाली, ज्या शरीरातून ती बाहेर आली, त्याचीच आकृती त्यांनी धारण केली, आणि त्याच शरीराच्या मेंदूने नेमून दिलेल्या कार्याला ती निघून गेली. कधी आमराईत, कधी विहिरीवर, कधी उसाच्या शेतात, कधी शहरातून गावात, कधी कॉलेजच्या भांडणात, तर कधी श्रृतीका पाठकच्या केबीन मध्ये..."
"पण हे ईतकं सहज नव्हतं डॉक्टर..." श्रावणने मला थांबवलं,
"मी एकाग्रतेने शुभंकरोती म्हणायचो, आणि मनात आमराईशीवाय अन्य कुठलाही विचार नसायचा. शहरात मन विटलं की गावाची आठवणच मनात असायची. घरी पैसे मोजत बसलो असतांना व्हॅक्युम क्लीनरच मनात होता, आणि कॅंटीन मध्ये बसलेलो असतांना श्रृतीका पाठकशीवाय कूठलाही अन्य विचार मनात नव्हता."
"म्हणजे जेव्हा तीव्रतेने, एकाग्र मनाने, तू एखादी गोष्ट चिंतीतोस, तेव्हाच प्रतीरूप तूझी ईच्छा पूर्ण करते, बरोबर ना?"
"अगदी बरोबर. पण याचाच अर्थ असा, की जर मी एकाग्रता वृद्धी केली, चिंतनशक्ती वाढवली, तर प्रतीरूप निर्माण करणं माझ्या हाती असू शकतं." श्रावणनं मला सर्वांत मोठा धक्का दिला.
"हो! नक्कीच!" मी नकळत बोलून गेलो.
"बस! डॉक्टर! हेच माझं लक्ष आहे आता. गावाकडे जाउन, तीथल्या वाड्यात एकटा राहून मला मिळालेलं हे वरदान मी जास्त विकसित करणार आहे. काही दिवसांनी मनात येइल तेव्हा क्षणार्धात मी ईथे असेल आणि क्षणार्धात गावी!क्षणार्धात विदेशात कदाचीत अवकाशातही!" श्रावण भारावून गेला होता. मी सुद्धा. श्रावणला पूर्वी वाटणारा पागलपणाचा शाप आता त्याला वरदान ठरला होता. मला अचानक 'नारायण नारायण' चे सुर आठवले. क्षणार्धात स्वर्गातून पृथ्वीवर व पृथ्वीवरून पाताळात प्रवास करू शकणारे देवर्षी नारद! कदाचीत त्यांच्याजवळही श्रावणसारखंच वरदान?!..."
-"येतो मी, डॉक्टर! हा व्हॅक्युम क्लीनर! आता याचे पैसे तर मी तूम्हाला कदाचीतच परत करू शकीन! त्यामुळे या श्रावणची आठवण म्हणून असू दे तूमच्याच जवळ. आता मला आज्ञा द्या" माझी तंद्री भंग करून श्रावण जायला निघाला.
"श्रावण थांब. येत जा अधून मधून. कसल्याही रुपात. आणि कळवत जा तूझी प्रगती. मी त्यावर प्रबंध लिहिन. तो जागतीक पातळीवर सादर करीन. आपल्याला जे कळलं ते जगालाही कळू दे की!" मी त्याला विनंती केली.
"जरूर! बराय डॉक्टर, येतो मी!"श्रावण वळला. मी त्याला दारापर्यंत सोडायला गेलो. का कूणास ठाउक, श्रावणचा निरोप घेतांना माझे डोळे भरून आले. तो झपझप चालत फाटकातून बाहेर गेला.

रस्त्यावरच्या गर्दीत दिसेनासा झाला.

मला तो अदृश्यः झाल्यासारखा वाटला.

-
चैतन्य स. देशपांडे