Monday, April 23, 2007

मनकवडा

"मग आता पुढे काय प्रोग्राम?" लॅबमधून बाहेर येत निशिकान्तने विचारलं.
"काही खास नाही सर, दोन ऑफीस अपॉईंटमेन्टस आणि सुटी!" डायरीत निरखून पहात सेक्रेटरी बोलली. "ओके" म्हणून त्याने पावलं केबीनकडे वळवली. आपल्या पिसीचं बटन ऑन करून तो रिव्हॉल्वींग चेअरवर विसावला. मनस्वी आनंदाने त्याने बसल्या बसल्याच गिरकी घेतली आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटातली पंचधातूची अंगठी आणि करंगळीच्या वाढलेल्या नखाने टेबलावर आपला नेहमीचा ताल वाजवायला सुरुवात केली.
"आत येउ का?" केबीनच्या दारातून विनयचा आवाज.
"अरे ये ना, बस!" पिसीमध्ये पासवर्ड टाईप करत निशिकान्त बोलला.
"काय म्हणता निशिकान्त देशमुख?" विनय समोरच्या खुर्चीत बसला.
"अरे, आज आपण खुष आहोत एकदम!" निशिकान्त उत्साहाने बोलला.
"खूप दिवसांनी तूला ईतकं मोकळं हसताना पाहिलं. झालंय तरी काय?"
"आता तूला कुठून आणि कसं सांगावं तेच कळत नाही!" निशिकान्तला प्रश्न पडला.
"म्हणजे? असं काय घडलंय?" विनयची उत्सुकता वाढली.
"अरे, तसं काही नाही रे, पण आजची घटना जरा कामाच्या संदर्भात आहे, तेव्हा तुला समजावून कसं सांगायचं, हे कळत नाहीये." विचार करतानाच त्याची बोटं नकळत टेबलावर थीरकू लागली आणि नेहमीचाच ताल सुरु झाला.
"ओ... तुझ्या कामाच्या संदर्भातलं... म्हणजे माझ्या डोक्याच्या तीन हात वरूनच जाणार म्हण की!"
"खरं आहे तूझं, पण तरीही तुर्तास तूला ईतकं सांगू शकतो, की गेल्या दोन वर्षांपासून सूरु होता तो माझा प्रोजेक्ट.."
"एक मिनिट! हा ताल तू वाजवतोयस हा कुठेतरी एकल्यासारखा वाटतोय्! तू कुठे एकला होतास?" विनय निशिकान्तला मध्येच थांबवत म्हणाला.
"हा ताल आहे?" निशिकान्तच्या या प्रश्नाने त्याचं संगीताविषयीचं ज्ञान प्रकट केलं.
"हो रे, मी एकलास एवढ्यातच, पण आठवत नाही!" विनय आठवण्याचा प्रयत्न करत होता.
"डोक्याला ताण दे ना थोडा.. आठवेल!" निशिकान्तच्या वादनाला जोर चढला.
"आठवलं! अरे, मागच्या रवीवारी हैद्राबादला जो कॉन्सर्न झाला होता ना, त्यात एका कलाकाराने असाच ताल वाजवला होता बघ गोटूवाद्यावर! सॉलीड टाळ्या आणि वन्समोअरही मिळाला होता बेट्याला!" आठवल्याचं समाधान विनयच्या डोळ्यात दिसत होतं.
"बघा,आणि आमच्या कलेची कुणाला कदरच नाही!" निशिकान्तचं वादन थांबलं.
"तूमची कला? अरे बाबा, महिना महिनाभर या ईंन्स्टीट्युटच्या बाहेर पडत नाहीस तू. जेव्हा पहावं तेव्हा रिसर्च, नोटस, मिटींग्स... अरे स्वतःकडेही लक्ष दे जरा!"
"आता देणार आहे. अरे तेच तर तूला सांगत होतो. माझा हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की दोन महिने सुटटीच घेतो बघ स्वतःसाठी.""काय प्रोजेक्ट काय आहे?" विनयने परत विषयाला हात घातला.
"ब्रेन-रीडर!" निशिकान्तने सांगायला सुरुवात केली.
"म्हणजे डोकं वाचणार की काय तुम्ही?"
"तसंच समज. आता हे बघ ना, मी हा ताल वाजवत असतांना अचानक तूला हैद्राबादची घटना आठवली."
"हो, म्हणजे डोक्याला ताण देवून मी ती आठवली!"
"अगदी बरोबर! पण आठवत असतांना काय घडलं, ते तूला ठाउक आहे? आधी हा ताल तुझ्या मेंदुने एकला. मग त्याच्याकडे असलेल्या तालांशी हा जूळवून पाहिला. पण हे घडत असतांना तूझ्या मेंदूला तो ताल शोधायला जरा उशीर लागला, कारण त्याच्याजवळ खूपशे ताल सेव्ह आहेत. पण जेव्हा तूझ्या मेंदुने ताल शोधून काढला, तेव्हा मात्र तूला हैद्राबादका संपूर्ण प्रसंगच आठवला."
"पण या घटनेचा 'ब्रेन-रीडर' शी काय संबंध?"
"आहे. आता तूझ्या मेंदूला हा ताल एकल्यावर त्याच्या बद्द्ल शोधाशोध करायची काहीएक गरज नव्हती, तरीसुद्धा त्याने स्वतःहून ती केली. याला मेंदुची स्पॉन्टॅनिअस ऍक्टीव्हिटी म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक आज्ञा मेंदु ज्याप्रमाणे स्वतःहून देतो व पाळतो, तश्याच यादेखील एक्टीव्हिटीज तो स्वतःहून करतो."
"पण ब्रेन-रीडर..." विनयची शंका अजूनही कायम होती.
"तर अशाच मेंदुच्या स्पॉन्टॅनिअस ऍक्टीव्हिटीज चा स्टडी आमच्या ब्रेन रीडरमध्ये होतो. मेंदु कुठलीही गोष्ट आठवत असतांना जी कंपने त्याच्यावर निर्माण होतात, त्या कंपनांना जमवून त्यांचा योग्य अर्थ लावला तर, आपल्याला समोरच्याने काय विचार केला, ते कळू शकेल."
"पण मी काय विचार केला अन काय शोधले हे तर तुला माहितीच आहे!"
"हो, पण हे तूझ्या बाबतीत.तुला हैद्राबादची घटना माझ्याशी शेअर करायची होती, पण अनेकदा असेही होते, की तूला अशी काही घटना आठवते जी मला सांगण्यासारखी नाही, मग ती घटना आठवून मेंदु तशीच ठेवतो. मात्र या वेळला तूझ्या मेंदुत निर्माण झालेली कंपने जर मी कलेक्ट केली, आणि त्याचा अर्थ लावला, तर ती गोष्ट मला कळू शकते." निशिकान्त भारावून बोलत होता.
"पण मेंदुची कंपने गोळा करणार कशी? त्याचा अर्थ लावणार कसा?" विनयने आता मुख्य मुद्दयाला स्पर्ष केला.
"दॅट्स द पॉईंट! त्यासाठीच तर मी स्टडी करत आहे. मेंदुची कंपनं रिसीव्ह करु शकेल असं शक्तीशाली रिसेप्टर, आणि त्या कंपनांचा अर्थ लावण्यासाठी त्यांची गती हजारो पटीने कमी करुन दाखवणारं सॉफ्टवेअर याचा शोध मी घेत आहे." आपलं बोलणं संपलं हे दर्शवल्यागत निशिकान्तने समोरचा पाण्याचा ग्लास रीता केला.
"कठीण आहे!" विनय गहन विचार करत बोलला.
"पण अशक्य नाही. मी आशावादी आहे," निशिकान्त आत्मविश्वासाने म्हणाला.
"छान! वैज्ञानिकानं आशावादी असणं त्याच्या यशाचं लक्षण आहे.
"बरं, तू कसाकाय आला होतास? सहज?" निशिकान्तने विषय बदलवला.
"बघ. तूझ्या या गोंधळात माझं काम राहूनच गेलं. हे घे." म्हणत विनयने एक पाकिट निशिकान्तच्या हाती दिलं.
"हे काय आहे?" न उघडताच निशिकान्तने विचारलं.
"येत्या रविवारी माझा सेमिक्लासिकल गाण्यांचा कॉन्सर्न आहे बोरगावला. ये जमल्यास."
"पास आहे ना? मग दे!" मिश्कील हसत निशिकान्तने पाकीट उघडायला सुरुवात केली होती, तोच त्याच्यासमोरचा ईंटरकॉम वाजला.
"ओके. हं दे पाठवून आत!" त्याच्या बोलण्यावरून दूसरी अपॉईंटमेन्ट आली आहे. हे विनयनं ओळखलं. "चल मग, मी येतो." त्यानं निरोप घेतला.
"थांब रे, कुणीतरी मिस मंजीरी जोशी आलीय मला भेटायला!"
"काय? मीस मंजीरी जोशी?" 'मीस'वर जरा जास्तच जोर देत विनय पून्हा खूर्चीत बसला.
"मे आय कम इन्?" दारातून आवाज आला.निशिकान्तच्या हो म्हणायच्या आत एक मुलगी आत आली आणि आत आल्यावर निशिकान्तला हो म्हणायचं लक्षातच राहिलं नाही.
"गुड ईव्हीनिंग. मी मंजीरी जोशी." तीनं आपली ओळख करुन दिली.
"बसा." निशिकान्त अजूनही तीच्याकडे बघतच होता.
"मी ओळखलं नाही..."
"आश्चर्य आहे. बरं, मीच ओळख करून देते. मी मंजीरी जोशी. उद्या तुम्ही मला बघायला माझ्या घरी येणार आहात."
"अरेच्या हो! माझ्या लक्षातच नाही बघा!म्हणजे मी फोटो पाहिलाय तूमचा!पण तुम्ही आज अचानक ईथे, म्हणजे काही कळलंच नाही! म्हणजे असंकाही अपेक्षीतच नव्हतं..म्हणून!" निशिकान्तनं ओळख न पटल्याचं स्पष्टीकरण देणं सुरु केलं.
"ईटस ओके, पण मला वाटलं की, मी उद्याच्या कार्यक्रमाआधी तुम्हाला भेटावं... "
"कल्पना चांगली आहे. तुम्ही बसा. काय घेणार? विनय तू?"
"काही नको.. मी निघतो आता. अजून पुष्कळ पत्रीका वाटायच्या आहेत. तू ये मग कार्यक्रमाला. जमल्यास दोघंही या, चल मी निघतो!" विनयनं सगळ्यांचा निरोप घेतला. मंजीरीनं गोड हसून त्याला निरोप दिला. निशिकान्त तर पार गोंधळून गेला होता. विनय निघून गेल्यावर केबीनमध्ये जरावेळ शांतता पसरली. "मला कॉफी चालेल!" मंजीरीनेच बोलायला सुरुवात केली. निशिकान्तने लगेच ईंटरकॉमवरुन कॉफीची ऑर्डर दिली. "तुम्हाला माझी भेट आधी घ्यावी असं का वाटलं?" निशिकान्तनं विचारलं.
"बघा ना, उद्याचा कार्यक्रम मलाही माहिती आहे, अन तूम्हालाही. अगदी टिपीकल मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. चहा-पोहे, बोलणी वगैरे. पण आधीच तुम्हाला भेटून घ्यावं आणि या टिपीकल गोष्टींना थोडं टाळावं असं वाटलं. आणि शेवटी तूम्ही मला पहायला येणार, मी थोडीच तूम्हाला पहायला येणार? तेव्हा तूम्हाला पहायचं, म्हणजे तूमच्या कामाच्या ठीकाणापेक्षा चांगली जागा नव्हती! म्हणून मग 'मॅन ऍट वर्क' ला पहायला आले! तूम्हाला आवडलेलं दिसत नाही!" मंजीरी भरभरून बोलत होती. बोलणं झाल्यावर ती मोहक हसली.
"नाही, तसं काही नाही! पण मी थोडा ऑर्थॉडॉक्स आहे म्हणून म्हणा हवं तर्, पण मला आश्चर्य वाटलं..."
"तूम्ही साईँटीस्ट असून ऑर्थॉडॉक्स! आता मात्र मला आश्चर्य वाटू लागलं आहे. मला वाटलं होतं, तूम्हाला माझं हे असं येणं खटकणार नाही! एनिवेज्, आय ऍम सॉरी, पण मला यात काही गैर वाटत नाही!"
"खरं म्हणजे मलाही तूमचं म्हणणं पटतंय्.."
"पटतय ना! मग झालं तर!.." आणि हलकेच कॉफीचा आस्वाद घेत ती नेहमीसारखं गोड हसली.
"मी सध्या रीकामीच असते! म्हणजे पपांची ईकडे ट्रान्स्फर झाल्यापासून..." तीने माहिती दिली.
"आधी आम्ही नागपूरला होतो. आमचं घर ना, अजूनही तीथेच आहे" मंजीरीच्या गप्पांच्या ओघात बराच वेळ निघून गेला.निशिकान्तला कमीच बोलायला देत ती मनमोकळं बोलली, आणि निरोप घेउन निघूनही गेली.निशिकान्तने ऑफीस अवर्स संपल्याची खात्री आपल्या डिजीटल वॉचकडून करुन घेतली, आणि पिसीमधली 'निशिकान्त' फाईल उघडली. रोजची डायरी लिहण्याची ही त्याची डिजीटल पद्धत. मंजीरीबरोबर झालेल्या अनपेक्षीत भेटीचा वृत्तांत लिहतांना त्याला अनेकदा मजकूर डिलीट करुन लिहावा लागला. दूसर्या दिवशी दूपारी तीन नंतर तो रजेवर होता. तोपर्यंत त्याला सॉफ्टवेअर ईंजीनियर्सबरोबर महत्त्वाची मिटींग आटोपायची होती आणि लॅबमधली काही कामं उरकायची होती. सेक्रेटरीला योग्य त्या सूचना देउन त्याने ऑफीस सोडले. घरी येतांना त्याच्या डोक्यात सारखं मंजीरी आणि तीचं मोहक हास्यच होतं, हे वेगळं सांगायला नको! आज निशिकान्तला जाग आली तीच मुळी "दादा मला एक वहिनी आण" च्या सुरांनी. आपल्याला दादा म्हणणारी कूणी बहिणच नसतांना हे सूर घरात घूमतांना एकून तो खाड्कन उठून बसला. समोरच्या हॉलमध्ये बाबा रेडिओ एकत होते. रेडिओवरचे या गाण्याचे सुर घरात घूमत होते. "एचव्हीडी अन ई-म्युझीकच्या जमान्यात बाबांचं हे रेडिओप्रेम घरातच नव्हे तर संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय होते. डोक्यावर हात मारून घेत बाथरूमकडे गेलेला निशिकान्त बाबांचं मिश्कील हसू एकू शकला नाही. सॉफ्टवेअर ईंजीनिअर्सबरोबरची मीटीँग हवी तशी पार पडली. दोन वाजताच निशिकान्त कामाच्या व्यापातून मोकळा झाला आणि तीन वाजता मंजीरीला पाहण्याचा कार्यक्रम तीने सांगीतल्याप्रमाणेच पार पडला.
"दोन महिन्यांपूर्वीच मुंबईला आलो, पपांचं ऑफीस अन आईचं घरातलं काम, पण मी मात्र सारखी घरात बसून बोअर होत असते." मंजीरी निशिकान्तला सांगत होती.
"म्हणजे तू मुंबईत काहिच पाहिलेलं दिसत नाही अजून?"
" काहीच नाही! नाही म्हणायला एस्सेल वर्ल्डला जाउन आले एकदा!" आणि ती नेहमीसारखंच मोहक हसली."
अरे वा! एका दृष्टीने हे बरंच झालं! तुला फीरायला कुठे न्यायचं हा प्रश्नच मिटला. तू घरीच असतेस तेव्हा मला जेव्हा वेळ मिळेल,तेव्हा मी तूला फोन करत जाईल." निशिकान्तने मंजीरीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला, आणि विनयच्या म्हणण्याप्रमाणे तीला त्याच्याच कार्यक्रमाला घेउन जायचे ठरवून त्याने तीचा निरोप घेतला. निशिकान्तच्या आयुष्यात नवे पर्व सुरु झाले. त्या दिवशीनंतरच्या रवीवारी निशिकान्तने मंजीरीला फोन करून संध्याकाळी तयार रहायला सांगीतलं. सहा वाजता निघाल्यास साडेसात पर्यंत बोरगावला पोचता येणं शक्य होतं. बरोबर साडेपाच वाजता निशिकान्तची गाडी मंजीरीच्या घरापुढे थांबली. घरात सर्वांच्या भेटीगाठी घेउन दोघेजण बोरगावकडे निघाले. मंजीरीने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती; तर निशिकान्तने त्याचा आवडता ब्लॅक ब्लेझर घातला होता. त्यावर लावलेलं गुलाबाचं फूल भाव खाउन जात होतं. बोरगावच्या वाटेवर गाडीने वेग धरला, आणि गप्पांनाही रंग चढला.
" साईंन्टीस्ट असूनही तूम्हाला गाण्याची आवड आहे?"
"म्हणजे काय? कॉलेजमध्ये तर माझ्या नी विनयच्या मैफली व्हायच्या! नंतर मार्ग वेगळे झाले, पण विनयने गाणं सुरुच ठेवलं, आज पहा, किती नाव कमावलंय बेट्यानं. मी गायक होउ शकलो नाही, पण त्याच्या कार्यक्रमांना आवर्जून जातो. जूने दिवस आठवतात!"
" मी पण लहानपणी गाण्याचा क्लास लावला होता, पण नंतर तो आपोआपच बंद झाला!" मंजीरी नेहमी सारखं गोड हसली.
" तूम्हाला आणखीही काही हॉबीज्..."
"ट्राफीक जाम!" तीचं वाक्य मध्येच थांबवत समोर बघून तो म्हणाला. समोर कितीतरी किलोमीटर्सपर्यंत वाहनांची रांगच रांग दिसत होती. दिड दोन तास तरी ट्राफीक मोकळा होणे शक्यच नव्हते. विचार करेपेर्यंत दोघांच्या गाडीमागे पाच पंचवीस गाड्यांची रांग लागली.
"शी: आता काय करायचं? प्रोग्राम तर गेलाच!" मंजीरीचा मुड ऑफ झाला होता.
"मुंबईत रहायचं तर असल्या गोष्टींची सवय करुन घ्यावी लागते मॅडम! चल जाउ दे, गाडी जरा बाजूला घेतो, ट्राफीक सुटेपर्यंत बाहेर एक चक्कर मारुन येउ. निशिकान्तने गाडीचा दरवाजा उघडला. जवळपासच्या निसर्गरम्य वातावरणात फीरत दोघेजण जवळच्याच एका झाडाखाली जाउन बसले.
"तूमच्या कोटवरचं गुलाबाचं फूल खूपच छान दिसतंय्!"
"दिसतंय ना? आमच्या घरच्या बागेतलं आहे. पण मघापासून सारखं ते मला सांगतंय की माझी जागा या कोटावर नाही." आणि निशिकान्तने ते फूल काढून मंजीरीकडे दिलं.
" मग तूम्हीच का ठेवत त्याला त्याच्या योग्य जागेवर?" आणि निशिकान्तने हलकेच ते फूल मंजीरीच्या केसांत लावलं.
"मंजीरी. एक विचारु?""विचारा ना, त्यात काय मोठंसं?" निशीकान्तने माळलेलं फूल तीने व्यवस्थीत केलं. " नाही, म्हणजे पहिल्यांदा तुझं ऑफीसमध्ये येउन थेट भेटणं, मोकळेपणानं बोलणं, हसणं, पाहून एक गोष्ट मनात येउन जाते."
"कुठली?"
"म्हणजे तू आहेसच अशी की, कुणालाही आवडशीलच! आय एम शुअर, तूला कॉलेज लाईफमध्ये शेकडो प्रपोसल्स आली असतील... त्यातलं एखादं स्वीकारलं होतंस का कधी?"
"मुंबईला येण्याआधी तूझं काही अफेअर वगैरे?, असं झटदिशी विचारुन टाकलं असतं तरी चाललं असतं" मंजीरी निशिकान्तला मध्येच थांबवत म्हणाली. यानंतर क्षणभर सगळं शांत झालं.
" वाईट वाटून घेउ नकोस,प्लीज!"
" अजीबात नाही, खरं म्हणजे तूम्ही विचारून घेतलंत हे बरंच झालं. आजकाल मुलगी जरा मोकळेपणानं वागली, की लोकांच्या मनात असल्या शंका घर करतात. वेळीच त्यांचं निरसन केलेलं बरं. माझ्या आयुष्यात आजवर तरी असं काहीच घडलं नाही, तूम्ही तर स्टेटसलापण जाउन राहून आलात. तेव्हा तूमचं काही अफेअर?" तीनं वातावरण मोकळं करण्यासाठी स्मीत करतच हा प्रश्न विचारला.
" अफेअर? केलं असतं, पण वेळच मिळाला नाही!" निशिकान्तच्या या उत्तरावर दोघे मनमोकळं हसले. "तुला ड्रायव्हींग येतं?" निशिकान्तला विषय बदलवावासा वाटला.
" हो! तूम्ही द्याल मला गाडी?" मंजीरीनं उत्साहात येउन विचारलं.
" नक्कीच! आता ट्राफीक सुटला की, तूच चालव गाडी." निशिकान्तने चाव्या तीच्याकडे दिल्या.
" चला,तूमची एक चावी तर माझ्या हाती आली!" आणि पाठोपाठ तीचं मोहक हसणं. नेहमीसारखंच. विनयचा कार्यक्रम पार पडला. ट्राफीक जाममूळे दोघांना तीथे जायला जमलं नाही, त्यामूळे निशिकान्तने मंजीरीला घरी सोडलं.
" अरे! तु लावलेलं गुलाबाचं फूल कूठे दिसत नाही..."
" अरे हो, कुठे बरं गेलं असावं?" मंजीरीने गाडीतच शोधाशोध सुरु केली.
" अगं जाउ दे ना, त्या झाडाखालीच पडलं असणार बहुत्तेक." निशिकान्तने तीचा निरोप घेतला.

त्या अविस्मरणीय दिवसानंतर दोघेही पूढचे आठ पंधरा दिवस भेटू शकले नाहीत. त्यांच्या पूढच्या भेटीत निशिकान्त मंजीरीला परत मागच्या वेळेच्याच झाडाखाली घेउन गेला. मंजीरीला आश्चर्य वाटलं.
"ईतकी आवडली ही जागा?"
"हो. अविस्मरणीय जागा आहे ही. आठव, मागच्या वेळी आपण ईथेच नव्हतो का थांबलो.."
"मी तरी विसरेन का? ती आपली दूसरी एकांतातली भेट."
"आणि दूसर्याच भेटीत तू खोटं बोललीस माझ्याशी." निशिकान्तच्या अश्या बोलण्यानं मंजीरीला धक्काच बसला.
"खोटं?म्हणजे?"
"नागपूरला बिकॉम सेकंड ईयरला असतांना तो तुला भेटला. अनिश. अनिश शुक्ला. दोघांच प्रेम होतं एकमेकांवर खूप. अगदी जीवापाड वगैरे म्हणतात तसं. आणि एक दिवस अचानक अनिश शुक्लाच्या घरच्यांनी त्याचं लग्न एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी लावून दिलं. सहा सात महीने झाले असतील या गोष्टीला. तू मग एकटी पडलीस. नागपूरला राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण तूझं मन तीथं लागे ना. तेव्हा पपांनी ईकडे मुंबईला बदली करुन घेतली. मुद्दामहून. बरोबर ना?" निशिकान्तच्या एकेका वाक्यासरशी मंजीरीला धक्का बसत होता.
"हो. खरं आहे, पण मी करु तरी काय शकले असते? त्याच्या घरचा बिजनेस पार बुडाला होता. पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना अनिशचं लग्न त्या मुलीशी करणं आवश्यक होतं. पण अनिशनं मला वचन दिलं होतं, की जेव्हा मी माझ्या जीवनाला नव्याने सुरुवात करीन, तेव्हा तो कधीच मध्ये येणार नाही. आणि आज हे त्याचं असं वागणं!"
"मंजीरी, अगं, हा अनिश शुक्ला काळा का गोरा तेदेखील मला माहिती नाही. मी हे सर्व जाणलं ते ह्या गुलाबामुळे..."त्या दिवशी माळलेलं गुलाबाचं फूल अजूनही टवटवीत होतं. त्याची पाकळी बाजूला करून दाखवत निशिकान्त बोलला.
" अगं वेडाबाई, हा माझा एक प्रयोग आहे. या फूलाच्या आत एक अत्यंत शक्तीशाली रीसेप्टर लावलेलं आहे, आणि सोबत आहे या रीसेप्टरने दिलेली माहीती गोळा करणारी मायक्रोचीप!"
"म्हणजे?" मंजीरीला काहीच कळेनासं झालं होतं.
"मी तुला विचारलेल्या अफेअरच्या शंकेनंतर तुझ्या मेंदूने आपोआपच तूझ्याबाबतीत घडलेला हा प्रसंग आठवला. त्यावेळी जी कंपने तूझ्या मेंदूवर उत्पन्न झाली, त्यांना या रीसेप्टरने कॅच करून या मायक्रोचीपमध्ये सेव्ह करून ठेवलं. नंतर या कंपनंची गती तीन हजार पटीने कमी करुन मी त्याचा अर्थ लावला, तेव्हा मला ही सारी कहणी आपोआपच समजली. कुणीही काहीही सांगायची गरजच राहीली नाही."
"तू मला तेवढ्यापूरतंच फसवलं असलं तरी मी देखील तूला फसवूनच ही माहीती गोळा केलेली आहे. पण मी तरी काय करणार? कुणाकडून एखादी गोष्ट काढुन घ्यायची असेल, तर त्याच्या नकळतच हे करावं लागणार! माझा प्रयोग सफल होण्यासाठी मला हे करणं आवश्यक होतं."
"केवळ एका प्रयोगासाठी?" तीने न रहावून विचारलं.
"केवळ प्रयोग? अगं माझा हा प्रयोग क्रांतीकारी ठरणार आहे. एखाद्याच्या मनात काय सुरु आहे, हे आपल्याला कळणं म्हणजे काय याची कल्पाना ही करणे अवघड, ती गोष्ट मी प्रत्यक्षात आणली आहे. मोठेमोठे गुन्हेगार आता बोलले नाहीत ना, तरी त्यांची सारी गुपितं आपल्याला लगेच समजतील."
"आणि माझ्या या प्रयोगाची तू पहिली साक्षी आहेस्. तूझं स्थान तर माझ्या आयुष्यात..."
"बस. आणखी काहीही बोलू नका, मला तूमच्या या प्रयोगाच्या क्रांतीबद्द्ल काहीही माहीती नाही. आणि माहीती करायचंही नाही. मला फक्त एवढंच ठाउक आहे, की माझा नवरा मनकवडा आहे!" मंजीरीनं डोळे पूसले, आणि ती मोहक हसली. नेहमीसारखीच!

8 comments:

Radhika said...

चैतन्य, छान जमली आहे गोष्ट. वाचताना वाटलं की आपले मुनी अंतर्ज्ञानाने सगळं जाणत होते म्हणजे हेच की काय ? गोष्टीला जो भावनिक शेवट केला आहेस तो छान वाटतो.

Unknown said...

Too Good Story

Ankush Kalkote said...

खरच खूप छान वाटली कथा...
अशाच सुन्दर कथा लिहीत जा....

n00b said...

खूप छान
I have posted it on my site
hope you dont mind
It will attract moe traffic to your blog

चैतन्य देशपांडे said...

मे महिन्याची नवी विज्ञानकथा ब्लॉगपोस्टवर प्रकाशीत झाली आहे. आपण पहिल्या कथेला दिलेल्या उदंड प्रोत्साहनामुळेच हे शक्य झालं.

Yogesh.khandekar said...

mast ahe

Unknown said...

खरच खूपच छान लिहितोस तू. एकदम सही .
हे सुचते कसे तेच कळत नाही माला.
माज्याकडे असायला हवा होता असे एखादे यन्त्र म्हणजे तुज्या कथा
माज्या जाल्या असत्या................

अशाच खुप खुप कथा लिहित रहा............
all the Best

Ashish Sarode said...

Chhan